नवी मुंबईच्या पाणी प्रश्नावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिले निवेदन;यावर महापालिका आयुक्तांनी बोलावली प्रशासनाची तातडीची बैठक.

नवी मुंबईच्या पाणी प्रश्नावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिले निवेदन;यावर महापालिका आयुक्तांनी बोलावली प्रशासनाची तातडीची बैठक.
नवी मुंबई :
नवी मुंबई शहरातील वाढती पाणीटंचाई, नागरिकांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, विकासकांकडून होणारा कथित अनधिकृत पाणीउपसा तसेच एमआयडीसी परिसरातील पाण्याचा गैरवापर या गंभीर प्रश्नांवर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
शहरातील सर्वसामान्य नागरिक, गावठाणे, झोपडपट्टी परिसर तसेच विविध सोसायट्यांमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मोठ्या बांधकाम प्रकल्पांकडून पाण्याचा अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक नागरिकाला समान आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रशासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी केली.
या मागणीची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत डॉ.कैलास शिंदे यांनी आजच पाणी प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे . बैठकीत नवी मुंबईतील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बैठकीमध्ये मुख्य जलवाहिन्यांवर हाय-प्रेशर मोटारी लावून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या विकासकांवर कारवाई, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, एमआयडीसी परिसरातील पाण्याचा गैरवापर, पाणीचोरीच्या तक्रारी तसेच शहरातील विविध भागांमध्ये समान दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच, कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही आवश्यक नियंत्रण ठेवण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली.
“नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येता कामा नये. नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचा अनधिकृत वापर किंवा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत होऊ नये. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी मिळणे आवश्यक आहे,” अशी स्पष्ट भूमिका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मांडली.
महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींची दखल घेऊन आवश्यक तपासणी व कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह ,अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष अरद्वाड, कार्यकारी अभियंता श्री. वाघचौरे, समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री. कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबईतील पाणीप्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळेपर्यंत प्रशासनाने प्रभावी नियोजन व आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे.
“नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करावे. पाणीचोरी अथवा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि सामान्य नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे,” अशी भूमिका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
Share this content:
Post Comment