*प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह प्रोजेक्ट मुंबई व माइंडस्पेस आरईआयटी एकत्र* *२०० हून अधिक ठिकाणी २ लाख नागरिकांना सहभागी करून घेत प्लास्टिक व ई-कचऱ्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचे सार्वजनिक उपयोगी साहित्यात रूपांतर करणारा अभिनव उपक्रम*
शाश्वत शहरी जीवनमान उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहकार्याने ‘नवी मुंबई प्लास्टिक अँड ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ हा अभिनव उप्रकम राबविण्यास सुरूवात केलेली आहे. प्लास्टिक आणि ई-वेस्टला आळा घालणे आणि चक्राकार प्रक्रिया पद्धतींना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाने सुरु असलेल्या या उपक्रमामध्ये माइंडस्पेस बिझनेस पार्क (माइंडस्पेस REIT) ही संस्था उद्योगांची सामाजिक जबाबदारी (CSR) या धोरणांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सक्रीय सहभागी झालेली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत आज प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिशिर जोशी आणि माइंडस्पेस आरईआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश नायर यांच्या झालेल्या बैठकीत यापुढील काळात प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा उद्देश साकरण्यासाठी राबविण्यात येणा-या रिसायक्लोथॉन उपक्रमाच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार उपस्थित होते. यावेळी प्लास्टिक बॉटल्सपासून बनविलेल्या आकर्षक टि शर्टचे अनावरणही संपन्न झाले.
रिसायक्लोथॉन उपक्रमाचे उद्दिष्ट वर्तनात्मक बदल घडवून आणणे आणि दैनंदिन जीवनात घनकचरा व्यवस्थापनाबद्दल आस्था निर्माण करणे हे आहे. या अंतर्गत 200 हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबवून 2 लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांना सामावून घेण्यात येणार आहे. विविध गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट्स, शाळा आणि सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने ‘क्षेपणभूमीवर शून्य कचरा नेणे (नो वेस्ट टू लँडफिल)’ हे ध्येय या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य करावयाचे आहे व याव्दारे नवी मुंबई शहराला भारतातील शाश्वत शहर विकासाचे मॉडेल म्हणून अग्रभागी आणावयाचे आहे.
या उपक्रमांतर्गत गोळा केलेले प्लास्टिक आणि ई-कचरा याव्दारे बेंचेस, प्लान्टर्स, वॉकिंग ट्रॅक आणि शालेय साहित्य यासारख्या वस्तू व साहित्य बनविण्यात येणार असून प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे. या माध्यमातून कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) आणि कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) हे ‘थ्री आर’ तत्व प्रत्यक्षात उपयोगात आणले जाणार आहे. या मोहीमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘झिरो वेस्ट गार्डन्स’ची निर्मिती हा आहे. या अंतर्गत पूर्णपणे रिसायकल केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून बनविलेल्या सुविधांनी उद्याने विकसीत केली जाणार असून याव्दारे शहर सुशोभिकरणाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला जाणार आहे.
संपूर्ण वर्षभरात अनेक जागरूकता मोहिमा राबविल्या जाणार असून त्यासोबतच नवी मुंबईला विस्तृत सागरी किनारा लाभला असल्याने किनारपट्टी व खारफुटी स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहिमा राबवल्या जाणार आहेत. यामध्ये ऐरोली येथील 2 माइंडस्पेस बिझनेस पार्कमधील कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक आणि विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतील. ही स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची चळवळ नवी मुंबईच्या पर्यावरणाला नवा आयाम देईल.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहर साकारण्यासाठी महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहयोगाने हाती घेतलेली रिसायक्लोथॉन मोहीम नवी मुंबईच्या स्वच्छता व प्लास्टिकमुक्त चळवळीला नवी गती दईल असा विश्वास व्यक्त करीत यामध्ये माइंडस्पेस आरईआयटी या संस्थेने पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले. सर्वांच्या एकत्रीत सहयोगाने व नागरिकांच्या सहकार्याने नवी मुंबई शहर देशातील सर्वोत्तम पर्यावरणशील म्हणून पुढे येईल असे ते म्हणाले.
प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्री.शिशिर जोशी यांनी हा उपक्रम कच-याचे संधीत रुपांतर करणारा असल्याचे सांगत, टाकून दिलेल्या वस्तूंचे आम्ही नागरिकांच्याच सहयोगाने सार्वजनिक वापराच्या मालमत्तेत रुपांतर करुन सामाजिक बांधिलकी जपत आहेत असे सांगितले. या माध्यमातून पर्यावरणाला घातक प्लास्टिकविरोधी सक्षम चळवळ उभी राहील अशी खात्री असल्याचे ते म्हणाले.
माइंडस्पेस आरईआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश नायर यांनी नवी मुंबईसारख्या देशातील एका उत्तम आधुनिक शहरात व्यवसाय करीत असतांना शहराप्रती असलेली कर्तव्य भावना जपत माइंडस्पेस यामध्ये सक्रीय सहभाग घेत असल्याचे सांगत अभिमान व्यक्त केला. रिसायक्लोथॉन उपक्रम हा भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे माध्यम असून यामधील सहभाग नवी मुंबईच्या पर्यावरणशीलतेला नवी गती देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहर स्वच्छतेत सातत्याने अग्रभागी असल्याने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला शहरांच्या एक,दोन, तीन अशा क्रमवारीपेक्षा अधिक वरच्या स्थानावर नव्याने निर्माण केलेल्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीमध्ये मानांकन प्राप्त झाले असून प्रोजेक्ट मुंबईच्या माध्यमातून आणि माइंडस्पेस आरईआयटी यांच्या सहयोगाने राबविण्यात येत असलेला रिसायक्लोथॉन उपक्रम हा स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहरासाठी एक यशस्वी सकारात्मक पाऊल आहे, जे नवी मुंबई शहराला शाश्वत पर्यावरणशील विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाईल.
Share this content:
Post Comment