‘अभय योजने’ला मुदतवाढ – आता १५ नोव्हेंबरपर्यंत शास्तीवर ७५ टक्के सूट करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयुक्तांचा निर्णय – नागरिकांना अंतिम संधी
‘अभय योजने’ला मुदतवाढ – आता १५ नोव्हेंबरपर्यंत शास्तीवर ७५ टक्के सूट
करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयुक्तांचा निर्णय – नागरिकांना अंतिम संधी
पनवेल, दि.17 : पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अभय योजना’ या शास्ती माफी योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. करदात्यांच्या वाढत्या मागणीनुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला आणखी 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या वाढीव कालावधीत, म्हणजे 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
या योजनेंतर्गत आतापर्यंत 581 कोटी रुपयांहून अधिक महसूल महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाला असून, नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून , नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्तांच्या सुचनेनुसार १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी सांगितले.
चौकट
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन – अतिरिक्त सवलतींची संधी
महानगरपालिकेच्या डिजिटल उपक्रमांमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. नागरिकांना आता www.panvelmc.org, कर-मित्र ॲप, तसेच Panvel Connect App द्वारे घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महानगरपालिकेने करदात्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत
• ई-बिल स्वीकारल्यास व ऑनलाईन पेमेंटद्वारे कर भरल्यास २% सवलत
• ऊर्जा बचत करणारे सौर पॅनल, शेड नेट, वॉटर हार्वेस्टिंग इ. उपाययोजना केल्यास २% कर सवलत
• घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट करणाऱ्या सोसायट्यांना २% सवलत
नागरिकांनी या सर्व लाभांचा फायदा घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
चौकट
‘कर-मित्र’ चॅटबॉट — नागरिकांसाठी आधुनिक डिजिटल सहाय्यक
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने नुकतच ‘कर-मित्र’ चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे. हा अत्याधुनिक डिजिटल सहाय्यक मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवतो.
‘कर-मित्र’ चॅटबॉटद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवा :
• मालमत्ता कराची थकबाकी त्वरित तपासणे
• मोबाईल किंवा संगणकावरून थेट कर भरणे
• बिल, पावती व कर गणनेसंदर्भात शंका निरसन
• योजना, सवलती व अंतिम तारखांबाबत अद्ययावत माहिती
पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या या चॅटबॉटचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करून या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
Share this content:
Post Comment