*दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा* *नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांचे आवाहन*
दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून या कालावधीत स्वच्छता, प्रदूषण प्रतिबंध, प्लास्टिक पिशव्यांच्या व एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर प्रतिबंध या बाबींकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. त्याचप्रमाणे हा दीपावली उत्सव स्वच्छ, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक साजरा करावा असे नागरिकांना आवाहन केले आहे.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीमध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यामध्ये ऑनलाईन कार्यप्रणालीवर भर देण्याचे सूत्र महानगरपालिकेने स्विकारलेले असून त्यानुसार मालमत्ता कर, पाणी पट्टी भरण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे न लागता घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर ऑनलाईन भरणा करता येतो याची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहचवावी व जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीव्दारे प्राप्त होणा-या तक्रारी, सूचना यांचा विभागनिहाय आढावा घेताना आयुक्तांनी तक्रार निराकरणाच्या कार्यवाहीला अधिक वेग द्यावा व तक्रारीवर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती संबंधित नागरिकांना देण्यात यावी असेही निर्देशित केले. प्रत्येक विभागप्रमुखाने त्याच्या विभागाशी संबधित कामकाजावर नियमीत निरीक्षण व नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने डॅश बोर्ड बनवून घ्यावेत व त्यानुसार कार्यप्रणालीत वेग आणावा असेही आयुक्तांनी सूचित केले.
बांधकाम पूर्ण झालेली मार्केट वापरात आणण्याच्या कार्यवाहीला त्यामधील अडचणी दूर करुन वेग द्यावा व याकडे संबधित विभाग अधिकारी आणि परिमंडळ उपआयुक्त यांनी बारकाईने लक्ष द्यावे असेही निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे या मार्केटमध्ये महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध् करुन द्यावी असेही सूचित करण्यात आले.
आता पावसाच्या उघडिपीनंतर उष्ण वातावरणामुळे रस्त्यांकडेचा चिखल वाळल्याने धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून त्यादृष्टीने सखोल स्वच्छता करण्याचा वेग वाढवून व हवाप्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवून या वर नियंत्रण आणण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. यासोबतच पावसाळी कालावधीत झालेले खड्डे बुजवून रस्ते सुधारण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
दिवाळी सणानिमित्त फटाके विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या परवानग्यांमुळे वाहतुकीला व सुरक्षेला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही याची खातरजमा करुन नागरिकांना यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन उचित कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी विभाग अधिकारी व अग्निशमन अधिकारी यांना दिले.
केंद्र शासनाची भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना अंतर्गत सुधारणांबाबत करावयाच्या कार्यवाहीचाही संबधित विभागनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. तसेच नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदारयादी विषयक कामकाजाची माहिती व सद्यस्थिती आठही विभाग अधिकारी व निवडणूक उपआयुक्त यांचेकडून आयुक्तांनी जाणून घेतली.
नवी मुंबई हे स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जाते. यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या पर्यावरणशील कृतीचा फार मोठा वाटा आहे. नुकताच नवी मुंबई महानगरपालिकेला पर्यावरण संवर्धन, सांडपाणी पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘हरित यशोगाथा सन्मान – सर्वांगीण उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आलेले आहे.
त्यामुळे यावर्षीचा दिवाळी सण साजरा करतांना दिवाळीत आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी, प्रदूषण करणारे फटाके उडवू नयेत, कागदी किंवा कापडी आकाशकंदील लावावेत, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, झाडांवर विद्युत रोषणाई करू नये तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून कच-याचे प्रमाण कमी करावे असे आवाहन करतांनाच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिवाळीनिमित्त साफसफाई करताना नागरिकांनी आपल्याला नको असलेले वापरण्यायोग्य कपडे, वस्तू, साहित्य कच-यात न टाकता आपल्या घराजवळच्या ‘थ्री आर’ सेंटरमध्ये ठेवावे, जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला ते वापरता येईल व त्याचीही दिवाळी आनंदात जाईल असे सूचित केले आहे. तसेच ही दीपावली सर्व नवी मुंबईकर नागरिकांना सुख, समृध्दीची, आनंददायी, भरभराटीची व आरोग्यसंपन्न जावो अशा शुभेच्छा नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.
Share this content:
Post Comment